Monday, 25 July 2022

सखी कामिनी





✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी





सनईची मधुर धून येई ही कानी,

लगबग सख्यांची होय अंगणी,

हळद लावूनी शकुनाची पिवळी,

चालली नववधू मंडपा बावरी...


अंगी काचोळी घट्ट जरीची सुंदर,

लेऊनी पैठणी हिरवीगार भरजरी ,

रूळे पाठीवर वेणी सुगंधी ही,

गळा रूळती माळा सोनियाच्या परी..


तिच्या कानात डुलती हिरे नी माणिक,

कपाळी कुंकवाचा टिळा शोभतो,

हातात सुवर्ण कंकणे नादती ती,

पायात पैंजणांची रूणझूणं....


कमरेस पट्टा सोनियाचा सुरेख,

पदर शोभतो मयुरांचा तीनं,

हातात शोभे बाजुबंद पाचुचा,

नाकी शोभते नथ ही सुंदर...


श्रृंगार सारा करूनी साजणी ही,

निघाली नव्या प्रवासा देखण्या,

तो पाहतो वाट आपुल्या प्रियेची,

ही मात्र लाजरी वधू षोडशा...


किती साजश्रृंगार हा यौवनाचा,

किती ते पर्व सुखाचे नवे,

तो पाहण्या आतुर तिला मंडपी अन्

ती मुग्ध वावरे सावरे स्वतःला..


त्याचा नी तिचा रेशीम शेला,

जणू गोफ हा जन्म जन्मांतरीचा,

ती उभी बाजूनी पटाच्या ,

तो उभा कासाविस पाहण्या..


त्याची नी तिची दृष्टादृष्ट पहिली,

जाहला सोहळा प्रितीचा अबोध..

ती तिथेच जाहली प्रियाची,

तो थक्क जाहला तटस्थ..


क्षण गोठले भावनेने सुखाचे,

जणू मंतरला क्षण अनुरागे अवघड,

ती लाजरी प्रिया बापूडी पाहते बावरूनी,

तो हसला गाली प्रसन्न..


घालूनी माळ त्याच्या गळ्यात सप्रेमे,

ती उभी अवघडूनी सलज्जा,

तो घालतो प्रीतीची माळ आनंदातिशयाने,

जणू मुग्ध तो लक्ष्मीचा पती सुंदर...



अशी प्रितीची ही कहाणी रंग घेते,

लग्नबंधनातुनी  ह्या सप्तरंगी,

तिचा होई पतीदेव त्याचीच ती ही,

संसारप्रेमी सखी कामिनी..

No comments:

Post a Comment